पुणे: पुण्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात तसेच नसरापूर आणि पर्वती-जनता वसाहत येथील पीडितांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे सोमवारी कलाकार कट्टा येथे निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच भारत सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) अहवालानुसार महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेल्याची बाबही या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
अहवालानुसार राज्यात दररोज सरासरी आठ बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्याचवेळी अशा गुन्ह्यांपैकी मोठ्या प्रमाणावरील प्रकरणे पोलिस तपासासाठी प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराशी संबंधित तब्बल ७८ हजार ७२६ प्रकरणे प्रलंबित असून ही संख्या देशातील सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच न्यायालयांमध्ये सुमारे ३ लाख २९ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारवर टीका करत केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, तर महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी व्यवस्थात्मक बदलांची गरज असल्याचे म्हटले. कायद्याची कठोर अंमलबजावणी, जलदगती न्यायप्रक्रिया आणि दोषींना त्वरित व निश्चित शिक्षा यामुळेच गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, असे मत व्यक्त करण्यात आले. महिला व बालकांविरोधातील गुन्ह्यांबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवण्याची मागणीही करण्यात आली.
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी शाळा, पालक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत पोलिसांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती करंजावणे, सुरेखा भोसले, माधुरी गायकवाड, शितल कांडेलकर, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, शंकर थोरात, उज्वला गायकवाड, मुमताज शेख, अंजना वांजळे, संजय रणधीर, मनोज थोरात, सुभाष करांडे, निरंजन अडागळे, नौशाद अन्सारी, कुमार धोंगडे, सागर झा, उमेश बागडे, मिलिंद सरोदे, नितीन कुटे, किरण कांबळे, रमेश पवार आणि मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते.

