मुंबई: गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, या संपूर्ण प्रक्रियेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार Anant Gadgil यांनी केली आहे.
“सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीची कल्पना सरदार वल्लभभाई पटेल यांची होती, प्रत्यक्ष काम कन्हैयालाल मुन्शी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांनी पुढे नेले, तर उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. मग यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके कुठे येतात?” असा खोचक सवाल गाडगीळ यांनी उपस्थित केला.
गाडगीळ यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले असताना वेरावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिरावरील ऐतिहासिक आक्रमणांचा उल्लेख करत मंदिर पुनर्बांधणीचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही जबाबदारी कन्हैयालाल मुन्शी आणि काकासाहेब गाडगीळ यांच्यावर सोपविण्यात आली होती.
आज मात्र हा संपूर्ण इतिहास बाजूला ठेवून काही राजकीय नेते आणि मुख्यमंत्री आपणच जणू मंदिराचे पुनर्निर्माते असल्याचा आभास निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.
“काँग्रेसवर सतत अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला, याच काँग्रेसने सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीमध्ये निर्णायक भूमिका बजावल्याचा इतिहास विसरणे सोयीचे वाटत आहे,” असेही गाडगीळ म्हणाले.
सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी संबंधित सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचा संदेश मंदिर व्यवस्थापनाकडून १५ दिवसांपूर्वी मिळाला होता, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी गुजरात काँग्रेस कमिटीमार्फत त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि इतर तपशीलही मागविण्यात आले होते.
“मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. उलट, सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नसलेले लोक आज त्या इतिहासाचे श्रेय घेत कार्यक्रम साजरा करत आहेत,” अशी उपरोधिक टीकाही गाडगीळ यांनी केली.

