पुणे
पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी या मागणीला जोर आला आहे.
पुण्यातील या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी हसन मुश्रीम, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, रवींद्र धंगेकर आदी अनेक नेते उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाच्या कोनशिलेवर भाजप आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते. त्याशिवाय हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीदेखील सुनील कांबळे यांचा तेथील अन्य कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजप आमदारांना सत्तेचा माज – विजय वडेट्टीवार
काल अब्दुल सत्तार
आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज …
भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो…
सुषमा अंधारेही संतापल्या…
भाजप आमदार सुनील कांबळे हे कायमच अर्वाच्य आणि शिवराळ भाषा, मारहाण , दादागिरी करण्यासाठी कूप्रसिद्ध आहेत. असे करण्याची त्यांची वारंवार हिंमत वाढत जाते कारण भाजपचा आमदार असल्यामुळे भाजपाकडून गुन्हेगारी कृत्यांचे जणू आमदार खासदारांना परमिट मिळाले आहे.