मुंबई — काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी भाजपाचे प्रवक्ते प्रिंटो महादेवनने दिली असून हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे असे म्हणतात की, राहुल गांधी हे समाजातील वंचित, मागास, आदिवासी व अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. सामाजिक न्याय, एकता व बंधुत्वाची भाषा ते करतात. गांधी कुटुंबाला नेहमीच धोका राहिलेला आहे, आता तर गोळ्या घालण्याची थेट धमकी देण्यात आली आहे, ही अत्यंत गंभीर घटना असून याचे गांभिर्य पाहता राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारावर गंभीर कारवाई करा आणि लोकशाहीत अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत असा कडक संदेश द्या, तसेच लोकप्रतिनिधींना निर्भयपणे त्यांचे कर्तव्य पार पाडता आले पाहिजे असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.