मुंबई –केंद्रीय Election Commission of India ने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार तसेच माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदानासाठी सर्व केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असणार आहे. त्यासोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड आणि आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यांसारखी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि संबंधित राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक कार्यक्रम
३० मार्च २०२६ – राजपत्र अधिसूचना जारी
६ एप्रिल २०२६ – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
७ एप्रिल २०२६ – अर्जांची छाननी
९ एप्रिल २०२६ – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
२३ एप्रिल २०२६ – मतदान
४ मे २०२६ – मतमोजणी
६ मे २०२६ – संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण
निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकांसाठी प्रशासनाला आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.

