मुंबई — केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘IIT Bombay’ संदर्भात केलेल्या विधानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आयआयटीच्या नावात “मुंबई” न ठेवता “बॉम्बे” ठेवणे योग्य ठरले’ या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याला ठाकरे यांनी “मुंबईला महाराष्ट्रापासून दूर नेण्याचा प्रयत्न” असे संबोधत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर गंभीर आरोप केले.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली.
जितेंद्र सिंह यांच्या विधानावरून वादंग
अलीकडे मुंबईत आयोजित आयआयटी कार्यक्रमात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी —
“IIT च्या नावातील ‘Bombay’ ठेवलं, ‘Mumbai’ केलं नाही, हे चांगलं झालं” असे विधान केले.
हे विधान सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
त्यांच्या मते, अशा सूचक भाषणांद्वारे मुंबईला स्वतंत्र प्रशासकीय चौकटीत ढकलण्याचा “हळूच” प्रयत्न सुरू आहे.
”मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव” — ठाकरे यांचा आरोप
ठाकरे म्हणाले की, “मुंबई जी मराठी माणसाची आहे, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव अनेक दशकं सुरु आहे. आता तो पुन्हा उघडपणे दिसू लागलाय.”
त्यांनी चंदीगडचे उदाहरण देत सावधगिरीचा इशारा दिला:
“केंद्र सरकारने चंदीगड पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वपक्षीय विरोध झाल्याने मागे हटले. पण ती तात्पुरती माघार आहे.”
त्यांच्या मते, असा प्रकार मुंबई आणि एमएमआर परिसरात होण्याची शक्यता “१०० टक्के” आहे.
”आधी मुंबई, मग पूर्ण MMR गुजरातला जोडण्याचा प्रयत्न”
राज ठाकरे यांनी पुढे दावा केला की, मुंबईला ‘Bombay’ म्हणत राहून हळूहळू ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR गुजरातला जोडण्याचा डाव आहे.”
मराठी माणसांना जागे राहण्याचे आवाहन करत त्यांनी म्हटले —
“केंद्रीय हस्तक, उद्योगपती काय काय ताब्यात घेत आहेत, हे आपण रोज पाहतो आहोत. आता उशीर नको.”
”जितेंद्र सिंह यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही” — ठाकरे यांचा टोला
ठाकरे यांनी डॉ. जितेंद्र सिंह यांना लक्ष्य करत म्हटले —
“ना त्यांचा मुंबईशी संबंध, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते जम्मूचे. पण सर्वोच्च नेतृत्वाची इच्छा ओळखून बोलत आहेत.”
हा टोला त्यांनी नेहमीच्या ठाकरे शैलीत लगावला.
मुंबईचे ‘मूलनाव’ आणि भावनिक आवाहन
आपल्या शेवटच्या संदेशात ठाकरे म्हणाले, “मुंबई हे नाव आपल्या मुंबादेवीवरून आहे. तिची लेकरं म्हणजे मराठी माणसं. आता तरी एमएमआरमधील सर्व मराठी जनांनी डोळे उघडावेत.”

