मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टीनी (Raju Sheeti ) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Loksabha) एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.तर महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, असं स्पष्ट सांगितलं आहे.
सध्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांची शिवसेना या मतदारसंघात उमदेवार देण्यासाठी उत्सुक आहेत. याआधी राजू शेट्टी यांनी दोन वेळा मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच ते पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत असा दावा शेट्टी यांनी त्यांच्या भेटीनंतर केला होता. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला तर हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित आहे. पण उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे. दरम्यान, जयंत पाटील आणि मविआच्या भूमिकेनंतर राजू शेट्टी यांनी यएकला चलोरीचीच भूमिका असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी उभा राहणारच, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
दुसरीकडे वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत (Prakash Ambedkar) बोलणे सुरू आहेत, दोन दिवसात अपेक्षित निर्णय होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तर माढ्याची जागा महादेव जानकरांना देण्याचे ठरलं होतं, मात्र ते महायुतीसोबत गेले, तिथे दुसरा उमेदवार शोधावा लागेल, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत .