पीपीपी मॉडेलमुळे रखडले प्रकल्प; व्यापारी हितसंबंधांचा आप चा आरोप
पुणे – मेट्रो स्टेशनसाठी पाडण्यात आलेले शिवाजीनगर एसटी बस स्थानक अद्यापही मूळ जागेवर उभे राहू शकलेले नाही. तब्बल पाच वर्षे तात्पुरत्या ठिकाणी (जुना पुणे-मुंबई महामार्ग) सुरु असलेले हे बस स्थानक कायमस्वरूपी परत मूळ जागी हलवले गेलेले नाही. या रखडलेल्या प्रकल्पामागे काही व्यापारी हितसंबंध कार्यरत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
महा-मेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यात सहा वर्षांपूर्वी करार झाला होता. मेट्रोसाठी वापरलेली जागा बदल्यात एसटी स्थानक उभारून देण्यात यावे, अशी तरतूद होती. मात्र, मध्यवर्ती भागातील ही मोक्याची जागा व्यापारी संकुलासाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू असल्याने बस स्थानकाचे पुनर्बांधकाम रखडल्याचे किर्दत यांनी सांगितले.
सन २०२३ मध्ये शशी प्रभू आर्किटेक्ट यांच्याकडून नवीन एसटी स्थानकासाठी नकाशे मागवण्यात आले होते. त्यानुसार एसटी स्थापत्य विभागाकडून काम सुरू होईल, असे महामंडळाच्या विद्या बिलारकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुन्हा काम अडथळ्यात आले आणि आता हे बांधकाम महा-मेट्रोमार्फत होईल, असे ठरवण्यात आले.
“आजअखेर या प्रकल्पासाठी कोणताही अधिकृत करार झालेला नाही. तसेच कोणताही अधिकृत बांधकाम नकाशा तयार झालेला नाही,” अशी माहिती पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
“या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी काहींना स्वारस्य असल्यामुळे पुणेकर व बाहेरगावच्या प्रवाशांची अडवणूक केली जात आहे. प्रकल्प लांबणीवर टाकला जात आहे,” असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या संपूर्ण प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे.