iमुंबई – बॉम्बे हायकोर्टचे नामांतर करून ते अधिकृतपणे ‘मुंबई उच्च न्यायालय’ असे घोषित करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी शिवसेना नेते आणि विधानसभा प्रतोद आ. सुनील प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
प्रभू यांनी आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विशेष शासकीय ठराव संमत करून केंद्र सरकारकडे पाठवावा, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
प्रभू यांनी पत्रात नमूद केले की, गेल्या २० वर्षांपासून बॉम्बे हायकोर्टचे नामकरण ‘मुंबई उच्च न्यायालय’ करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अनेक आमदार व खासदारांनी केंद्र सरकारशी पाठपुरावा करूनदेखील कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे हा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे.
त्यांनी केंद्र सरकारने High Court Patent (1862) यानुसार आवश्यक सुधारणा करून नामांतराची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणीही नोंदवली आहे.
प्रभू म्हणतात, “राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी जनतेची दीर्घकालीन मागणी पूर्ण केली. यामागे मराठी साहित्यिक आणि मराठी जनतेचा संघर्ष आहे. विधानसभेत विविध ठराव मांडून त्यांची अंमलबजावणी करण्याची परंपरा आहे.” याच पद्धतीने बॉम्बे हायकोर्टचे नामकरण करण्यासाठीही विधानसभेने पुढाकार घ्यावा, असे ते सुचवतात.
शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी मागणी केली, ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विशेष शासकीय ठराव मांडावा, ठराव सर्वानुमते मंजूर करून केंद्र सरकारकडे नामांतरासाठी पाठवावा.
प्रभू यांनी म्हटले की, “मुंबई उच्च न्यायालयाचे नामकरण ही केवळ मागणी नाही, तर मराठी जनतेचा गौरव आणि भावनिक प्रश्न आहे. विधानसभा आणि मंत्रिमंडळाने याकडे गांभीर्याने पाहावे.”

