महाराष्ट्र ताज्या बातम्या

महसूल खाते निवडणुकीत व्यस्त; रेती माफियांनी सावित्री नदीत दिवसाढवळ्या वाळू केली फस्त!

महाड: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत महसूल प्रशासन पूर्णपणे व्यस्त असतानाच या संधीचा गैरफायदा घेत रेती माफियांनी सावित्री नदीच्या खाडीपात्रातून दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केभुर्ली परिसरात, ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल रिद्धेशजवळ सावित्री खाडीपात्रात पोकलेन मशीनच्या सहाय्याने सर्रास वाळू उपसा सुरू असून, ही वाळू थेट डंपरमध्ये भरून विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक कामामुळे महसूल यंत्रणा पूर्णतः व्यस्त असल्याने या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू असल्याने तलाठी, मंडळाधिकारी यांच्यासह संपूर्ण महसूल विभाग निवडणूक कामात गुंतलेला आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत रेती माफियांनी खुलेआम नदीपात्रात उत्खनन सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, विनापरवाना वाळू चोरी सुरू असताना तलाठी आणि मंडळाधिकारी डोळ्यावर काळी पट्टी बांधून झोपले आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत तलाठी सागर पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “असा कोणताही प्रकार सुरू नाही. डेझर मशीनद्वारे वाळू काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बातमीमुळे आम्हाला काही फरक पडत नाही,” असे उत्तर दिले.

तलाठींच्या या उत्तरामुळेच या रेती चोरीच्या व्यवसायात महसूल अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे का, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेली ही खुलेआम वाळू चोरी पर्यावरणासाठी घातक ठरत असून, सावित्री नदीच्या पात्राला मोठा धोका निर्माण झाला आहे.

निवडणुकीच्या आड लपून रेती माफियांचा उच्छाद सुरू असताना संबंधित विभाग कारवाई कधी करणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात