मुंबई
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून या निर्णयावर विरोध दर्शविला जात आहे. शरद पवार जिथं तोच पक्ष अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.
यावर रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी महाभारतातील एका प्रसंगाचा संदर्भ देत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. ‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं, त्यातून प्रेरणा घेऊन शरद पवार हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार, असं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले होते. त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला. पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तेव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला. नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला…
कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय. ‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्यातून प्रेरणा घेऊन शरद पवार हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार.