मुंबई — सांगली जिल्ह्यातील नवीन विमानतळ उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी व उद्योजकांकडून होत होती. अखेर या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून कवलापूर येथे विमानतळ उभारणीसाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळ विकास प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
मंत्रालयात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजीत कदम, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, कवलापूर येथील ६६.३६ हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी उपलब्ध असून, यामुळे सांगली जिल्ह्यातील गुंतवणूक व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. प्रकल्पासाठी प्रलंबित असलेले सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
प्रस्तावित विमानतळामुळे उद्योजक, व्यापारी व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, औद्योगिक गुंतवणूक व व्यापाराला नवी दिशा मिळेल. तसेच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळून सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणी अधिक सुलभ होईल. व्यापारी आणि प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

