मुंबई
संजय राऊत यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत, आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर अजित पवारांनीही दिलेल्या उत्तरानंतर दोघांमध्ये जुंपली आहे.
अजित पवारांना याबाबत विचारल्यावर, सोम्या-गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती. यानंतर संजय राऊतांनीही यावर जहरी टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत?
सोम्या-गोम्या कोण हे २०२४ ला कळेलच. त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली त्यांनी आमच्यावर बोलूच नये असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार टीकेला प्रत्युत्तर दिले.
याशिवाय पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यावर दिल्लीतून आक्रमण होत आहे. राज्यातील उद्योग रोजगार पळवले जात आहेत, मात्र विद्यमान सरकारमधील हौशे, नौशे, गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त महत्त्व दिलं जात आहे. मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास का हिरावून घेतला जात आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असं म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास.