महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईसह महापालिकेत स्वबळाचा पर्यायही खुला : सुनिल तटकरे

मुंबई — महायुतीतील सामंजस्य कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याने महायुतीतील चर्चा व वाटाघाटी या राज्यपातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होत असतात. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला.

तटकरे यांनी घेतलेली ठाम भूमिका ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत भाजप नेत्यांच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजप नेतृत्वाला देण्यात आल्याचेही मानले जात आहे.

खासदार तटकरे यांनी आज पक्षांतर्गत मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांचा आढावा घेत स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांमध्ये महायुती करण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याशी रात्री चर्चा केली जाईल. त्यानंतर महायुतीच्या दृष्टीने पुढील पावले उचलण्याचा प्रयत्न राहील, असा पुनरुच्चार त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळत तटकरे म्हणाले की, या संपूर्ण विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी प्रफुल पटेल आणि आपण चर्चा केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर दादा, प्रफुल पटेल आणि आपण सखोल मंथन केले असून, पुन्हा एकदा अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुंबईसह सर्व प्रमुख महानगरपालिकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना तटकरे यांनी वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले. मात्र, त्याचवेळी महायुती म्हणूनच निवडणुका लढाव्यात, हा आमचा प्राधान्यक्रम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपण कालपासून मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी यासंदर्भात सकारात्मक चर्चा होईल आणि अंतिम निर्णय जो काही घेतला जाईल, तो सर्वांसमोर मांडला जाईल, असे सांगत तटकरे यांनी सावध पण ठाम भूमिका घेतली.

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात