अहमदनगर/मुंबई : शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टकडून देवस्थानात एकूण ११८ मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप श्रद्धावान हिंदू भक्त जयेश नागेंद्रनाथ शहा यांनी केला असून, या विरोधात त्यांनी थेट ट्रस्टला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
जयेश शहा यांनी ३० एप्रिल रोजी ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “हे अत्यंत धक्कादायक असून, पारंपरिक हिंदू मंदिर व्यवस्थापनात इतर धर्मीय व्यक्तींची अशा प्रकारे नियुक्ती होणे हे श्रद्धाळूंमध्ये अस्वस्थता आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार मंदिरात पूजाअर्चा, धार्मिक विधी व व्यवस्था ही धर्माने पाळणं आवश्यक आहे.” त्यांनी या निर्णयाची तात्काळ चौकशी करून संबंधित नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजपा मुंबईचे मुख्य प्रवक्ते निरंजन मोहिनी लक्ष्मण शेट्टी म्हणाले की, “जयेश शहा यांचे म्हणणे योग्य आहे. पारंपरिक हिंदू धार्मिक स्थळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवडीत त्या धर्माच्या परंपरांचा सन्मान राखला पाहिजे. मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांची अशा पवित्र ठिकाणी नियुक्ती ही अयोग्य असून, हे हिंदू समाजाच्या श्रद्धांवर आघात करणारे आहे.”
“शनि शिंगणापूर हे हिंदू भक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारे धार्मिक समन्वयाच्या नावाखाली परंपरा मोडणारे निर्णय घेणे टाळावे. ट्रस्टने या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि यापुढे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री द्यावी,” अशी मागणीही शेट्टी यांनी केली.