मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह दिलं आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे नाव दिलं होतं. त्यावेळी पक्षचिन्ह देण्यात आलं नव्हतं. शरद पवार गटाकडून वटवृक्ष या चिन्हाचा पर्याय देण्यात आला होता. मात्र काल २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्हं दिलं आहे.
पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरुन याची माहिती देण्यात आली. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी हे शुभसंकेत असल्याचं सांगितलं. पुढे आव्हाडांनी लिहिलं आहे, निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना “तुतारी” हे चिन्ह देऊन दिला आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाला कोणतं चिन्ह मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता होती. त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं. परंतु, हे नाव येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं.
त्यामुळे या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात नेले होते. यानंतर निवडणूक आयोगाला आठवड्याभराच्या आत चिन्ह देण्याचे आदेश होते. यासाठी शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह न देता, तुतारी हे चिन्ह दिलं आहे.