महाराष्ट्र ताज्या बातम्या

लकवा मारलेला हात झालाय चांगला; पवारांचे पृथ्वीराज बाबांनाच साकडे

X: @ajaaysaroj

मुंबई: ज्या पृथ्वीराज चव्हाण यांचा कायम दुस्वास केला, त्याच चव्हाणांच्या आता, साताराची सीट वाचवण्यासाठी आणि बारामतीतही त्याचा फायदा उठवण्यासाठी, नाकदुऱ्या काढाव्या लागाव्यात, अशी वेळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आली आहे. श्रीनिवास पाटील यांनी उभे राहण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर पवार गटावर आता ही जागाच काँग्रेससाठी सोडण्याची वेळ आली आहे असे बोलले जाते. त्याचप्रमाणे बारामतीत थेट सुनेत्रा पवारांच्या रूपाने जबर आव्हान उभे असल्याने चव्हाण यांच्याशी हातमिळवणी करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय राहिला नाहीये.

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. खरंतर दुसरा कोणी नेता अथवा एखादे कुटुंब मोठे होणे हे शरद पवारांना कधीच आवडलेले नाही. मग ते अनंतराव थोपटे असो, बाळासाहेब विखे – पाटील असो की चव्हाण कुटुंबीय असो, राज्याच्या राजकारणात आपल्यापेक्षा कोणी मोठे झालेले पवारांना खपत नाही, असे नेहमीच बोलले जाते. अगदी स्वतःच्या घरात देखील राष्ट्रवादी पक्षाच्या उदयानंतर काही वर्षातच राज्यभर अजितदादा पवार यांची कामाची झपाटलेली शैली आणि बिनधास्त इमेज जास्त मोठी होत चालल्याचे लक्षात येताच शरद पवारांनी त्यांना वेसण घालायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून सुरुवातीला अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबद्दल भर पत्रकार परिषदेत पार्थ यांची निर्भत्सना करणारे स्टेटमेंट शरद पवारांनी दिले होते.

ते निवडून येणार नाहीत याची नीट काळजी घेण्यात आली होती, असेही बोलले जाते. अनंतराव थोपटे आणि बाळासाहेब विखे – पाटील या दोन घराण्यांना तर पवारांनी अक्षरशः पाण्यात बघितले. त्यांची जेवढी जमेल तेवढी नाकाबंदी करण्याची एकही संधी शरद पवारांनी सोडली नव्हती.

तोच दृष्टिकोन आणि तीच भावना त्यांची काँग्रेसचे सुविद्य नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत असल्याचे अनेकवेळा बघायला मिळाले आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात असताना अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागले. त्यानंतर दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींच्या मर्जीमुळे पृथ्वीराज चव्हाण थेट मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले. त्यांचे राज्यात येणे राष्ट्रवादीला आणि प्रामुख्याने पवार कुटुंबियांना रुचले नव्हते. पृथ्वीराज बाबांची मिस्टर क्लीन प्रतिमा आपल्याला त्रासदायक ठरू शकते हे धंदेवाईक राजकारणी असलेल्या पवारांनी व्यवस्थित ओळखले होते. राज्य सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक, सिंचन विभागाच्या कामाची श्वेतपत्रिका, लवासामधील आरक्षणे, हे सर्व विषय आणि कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटी फायली क्लिअर करायला मुख्यमंत्री चव्हाणांनी थेट नकार दिला होता. या सर्व प्रकाराला शरद पवार आणि राष्ट्रवादी वैतागली होती. जाणूनबुजून आपली अडवणूक केली जात असल्याची भावना पवारांसह अनेक राष्ट्रवादी नेते तेंव्हा माध्यमातून उघडपणे बोलून दाखवत असत.

अखेर स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमात व्यासपीठावरुन बोलताना शरद पवार यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.  “अलीकडच्या काळात  महिनोंमहिने फायलींवर सह्याच होत नाहीत, सत्तेत असलेल्या लोकांचा सह्या करायला हात थरथरतो की त्यांच्या हाताला लकवा मारला आहे हे एकदा बघायला पाहिजे,” असा अत्यंत हीन दर्जाचा शेरा मारत पवारांनी कोणाचेही नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनाच लक्ष्य केले होते हे सर्वांना उमगले होते.  त्यानंतर पवारांची ही शेरेबाजी अनेक काळ संपूर्ण राज्यभर गाजत राहिली.

पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधीच अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीलाच सुरुंग लावल्याने शरद पवारांना काँग्रेसचे महत्व अचानक पटले आहे. त्यातल्या त्यात बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचे आव्हान मिळाल्याने पवार सावध पवित्रा घेत आहेत.  याच मतदारसंघात इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला येथे काँग्रेसला मानणारा मतदार आहे. तर सातारामधून उदयनराजे भोसले यांच्या समोर श्रीनिवास पाटील उभे राहणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर तिथून तेवढाच तगडा उमेदवार म्हणून पवारांनी थेट पृथ्वीराज बाबांनाच साकडे घातले आहे. नाही म्हणायला, शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील यांच्या मुलगा सारंग पाटील असे उमेदवार राष्ट्रवादीमध्ये चर्चेत आहेत. पण आपले खास दूत म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला पाठवले आणि त्यांना उमेदवारीची गळ घातली असे म्हंटले जात आहे.  

सातारामधून चव्हाण उभे राहिले तर त्याचा फायदा केवळ सातारा मतदारसंघातच नाही तर बारामतीमध्ये देखील होणार आहे याची जाणीव पवारांना आहे.  त्यामुळे पवारांनी चव्हाण यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. ज्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या हाताला लकवा मारलाय का अशी शंका ज्या पृथ्वीराज चव्हाणांबद्दल शरद पवारांनी घेतली होती, आता त्याच चव्हाणांचा हात तुतारी जोरात वाजवली जावी म्हणून मदतीला घेण्याची वेळ पवारांच्यावर आली आहे.

येत्या एक दोन दिवसातच जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल तेव्हा कळेल पवारांचा प्रस्ताव चव्हाणांनी  स्वीकारला आहे की त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात