Twitter : @therajkaran
बीड
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल… मी पुन्हा येईल… असे सांगितले होते. मात्र देवेंद्र पुन्हा आले पण सीएम म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मी पुन्हा येईल असे सांगितले आहे, मात्र मोदींनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. माझं वय झालं म्हणता, पण तुम्ही माझं काय बघितलं, अशा परखड शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांना इशाराही दिला आहे. दरम्यान, पवारांच्या बीड मधील सभेला प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी पवार यांच्यासोबत स्टेजवर बसलेले नेते ही शरद पवार गटाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असतील, अशी राजकीय चर्चा होती.
बीड शहरातील पारसनगरी मैदानावर आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय जनता पार्टीसह सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांनाही सुनावले. ते म्हणाले, केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही. आम्ही स्थिर सरकार देऊ, अशी घोषणा ते करतात आणि पुन्हा राज्या – राज्यातील सरकार पाडतात. लोकांनी निवडून दिलेले सरकार भाजप उध्वस्त करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
चुकीच्या लोकांना आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना रोखण्याची आता वेळ आलेली आहे, असे स्पष्ट करत मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाल्यास ते मतदान यंत्रावरील कोणते बटन दाबतील आणि कोणाला कुठे पाठवतील हे नक्कीच समोर येईल, असे पवार म्हणाले. सत्तेच्या बाजूला जायचं तर बिनधास्त जा, पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याविषयी माणुसकी ठेवा, नाहीतर जनता तुम्हाला धडा शिकविल, असा इशाराही शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांना दिला.
संदीप क्षीरसागर यांनी कष्टातून नियोजन केले – शरद पवार
सभेच्या सुरुवातीला शरद पवार यांनी स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण काढली आणि काकूंचा नातू आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले. ते म्हणाले बीडमध्ये निष्ठेच्या बाबतीत कधीच तडजोड केली जात नाही, त्यामुळे अशा निष्ठावान लोकांच्या मागे बीडची जनता सातत्याने उभी राहते. संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या कष्टातून या सभेचे नियोजन केले. त्याबद्दल त्यांचे आभार असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
ही असतील पवार गटाचे संभाव्य उमेदवार
शरद पवार यांच्या या सभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे काही संभाव्य चेहरे समोर आलेत. आजच्या सभेत परळीचे जनक्रांती सेनेचे प्रमुख बबनराव गित्ते यांनी शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, बीडचे आमदार आणि सभेचे संयोजक आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार सय्यद सलीम यांची मंचावर उपस्थित होती.
पवारांसह आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार क्षीरसागर, सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांनी अजित पवार गटाचे मंत्री आणि स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.