X : @therajkaran
मुंबई
पक्षात बंड करून नवी चूल पेटवली खरी पण लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची सुरुवात आताच सुरू झाली आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप, शिंदे गट आणि पवार गटामध्ये कोणाला किती जागा मिळणार यावरुन पडद्यामागे रस्सीखेच सुरू झाली आहे.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभेसाठी समसमान जागावाटप व्हावं अशी भूमिका मांडली आहे. जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात अजित पवार गटाचे ४ खासदार आणि शिंदे गटाचे १३ खासदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही अजित पवार गट समान जागावाटपासाठी आग्रही असेल, अशी चर्चा आहे.