मुंबई
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात तेही पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचे केवळ राज्यभरातचं नाही तर देशभरात पडसाद उमटले आहे. अनेकांनी या वादामागे राजकीय कारण असल्याचाही आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर महेश गायकवाड यांच्या सोबत असलेले राहूल पाटील यांच्या हातालाही २ गोळ्या लागल्या होत्या, त्याही बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. महेश गायकवाड गंभीर जखमी असून त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरु आहेत. राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्या सोबत डॉक्टर यांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड काय म्हणाले?
एकनाथ शिंदेनी उध्दव ठाकरेंसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहे. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे. एकनाथ शिंदेंनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही.