मुंबई
कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर आता राज्यातही कांद्याला भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हवीभाव मिळणंही कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर मोठं संकट आ वासून उभं आहे.
शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मविआतील अनेक नेत्यांनी शेतकऱ्याची व्यथा सांगणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, त्याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
मात्र या व्हिडीओमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्याने एक शेतकरी कांदा फुकट विकत असल्याचं दिसत आहे. तब्बल 64 कांद्याच्या गोण्या शेतकऱ्याने फुकट विकायला काढल्या आहेत. शेतकऱ्यांचं वास्तव सांगणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा उभा राहतो.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्यातला हा व्हिडिओ आहे माहित नाही, पण राज्यातील शेतक-याचं हे वास्तव आहे. ‘हमीभाव’ तर सोडाच पण त्यांच्या ‘मेहनतीचा पैसा’ही मिळत नाही. ‘बळीराजा’च्या नावाने मोठमोठ्या घोषणा करायच्या पण योजना त्यांच्यापर्यंत पोहचतच नसल्याने भ्रष्ट व्यवस्थेत शेतक-यांचाच ‘बळी’ जातोय. इथे कुणी शेतकरी बंधू-भगिनी असतील तर तुमची मतं इथे जरूर नोंदवा. तुमच्यावतीने आम्ही सरकारला जाब विचारू.