ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार पक्षांतर्गत गँगवॉरमधून; उद्योगमंत्री उदय सामंत

By अनंत नलावडे
X : @NalavadeAnant

मुंबई

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवीच घटना असल्याचे सांगत ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा विरोधकांच्या प्रयत्नांचा उदय सामंत यांनी शुक्रवारी तीव्र निषेध केला.

ठाण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सामंत यांनी विरोधकांना, विशेषतः ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावरही आपल्या शैलीत थेट निशाणा साधला. अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून केलेली हत्या ही ठाकरे गटातीलच एक मोठे षडयंत्र असून पक्षांतर्गत गँगवॉरमुळेच मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केल्याचा दावा सामंत यांनी केला. या दोघांमध्ये ‘मी नगरसेवक होणार की तू’? हा वाद होता. यामधूनच हा प्रकार घडल्याचा आरोपही सामंत यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे. अभिषेक घोसाळकर याची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो यानेही वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी मॉरिस नोरान्हो हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशीच संबंध होता, हे विस्तृतपणे सांगत त्यासाठीच सामंत यांनी ‘सामना’ दैनिकातील कात्रणेच यावेळी पत्रकार परिषदेत सादर केली. या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातून घडल्याचे ठळकपणे अधोरेखित केले.

सामंत पुढे म्हणाले की, अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्होचे उदात्तीकरण पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ मधून करण्यात आले. ‘सामना’तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबाही दिला जात होता. मॉरिसच्या कामाला ‘सामना’तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता, असे स्पष्ट असताना राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरणे चूक आहे. आरोप – प्रत्यारोप होतात, हे मी समजू शकतो, त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो. पण आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचे व त्यांना बदनाम करायचे ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे, त्याला छेद देण्याची आज गरज असल्याचे नमूद करत सामंत यांनी अप्रत्यक्षपणे खा. राऊत यांना लक्ष केले.

हे ही वाचा – ठाकरे गटाचे नेते घोसाळकरांवरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक, घेतला महत्त्वाचा निर्णय

सामंत पुढे म्हणाले की, मी कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कुणाला आदर्श मानतो आणि मी कुणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे, असे ट्विट्स देखील मॉरिसने सोशल मिडीयावर टाकलेले आहेत. म्हणून अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण, याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? अशी रोखठोक विचारणा करत या दोघांनी ठाकरे गटातच एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्ह पूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याचीही यावेळी चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही सामंत यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात