X : @therajkaran
मुंबई: अमरावती येथील सभेसाठी प्रहार स़ंघटनेला फक्त जिल्हा परिषदेची परवानगी प्राप्त झाली होती, अन्य परवानग्या मिळाल्या नव्हत्या, असा प्राथमिक अहवाल असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता राज्यात लागू झाल्यापासून आतापर्यंत सीआरपीसी कायद्यांतर्गत ९५ हजार २५० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली.
मंत्रालय वार्ताहर कक्षात आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक अधिकारी बोलत होते. लोकसभा निवडणूक दुस-या टप्प्यात राज्यात २६ एप्रिल २०२४ रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदार संघांत मतदान होत आहे. एकूण दिड कोटी पात्र मतदार असून १६ हजार ५८९ मतदान केंद्रे असून अमरावती, हिंगोली, परभणी येथे उमेदवार संख्या जास्त असल्याने तीन बॅलट युनिट असतील. पुरुष मतदार ७७ लाख २१ हजार ३७४ तर महिला मतदार संख्या ७२ लाख ४ हजार १०६ इतकी आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
राज्य निवडणूक अधिकारी म्हणाले, ७ मे २०२४ रोजी मराठवाड्यातील दोन, पश्चिम महाराष्ट्रातील सात, कोकणात दोन अशा अकरा ठिकाणी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडेल. एकूण २ कोटी ९ लाख पात्र मतदार आहेत. तर एकूण उमेदवार संख्या २५८ इतकी आहे.
राज्यात निवडणूकीचा चौथा टप्पा १३ मे २०२४ रोजी अकरा मतदारसंघात पार पडेल. २३ एप्रिल पर्यंत १५३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २७ इतकी आहेत, असेही राज्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.