शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा; रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष
बुलडाणा/पुणे : बुलडाण्यात झालेल्या वादळी बैठकीनंतर आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार असून, शेतकऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागण्या व समस्यांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील शेतकरी अडचणीत; लढ्याची गरज
सध्या राज्यभरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जमाफी, पिकविमा, सोयाबीन-कापसाच्या दरातील तफावत, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेली अनुदाने तसेच ऊस, कांदा आणि दुधाच्या दरवाढीसंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर, संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पुण्यात ३ मार्चला महत्त्वपूर्ण बैठक
३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे ही बैठक होणार आहे. राज्यभरातून आलेले शेतकरी नेते आणि कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होणार आहेत. शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा आणि संभाव्य मोठ्या आंदोलनाबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

रविकांत तुपकरांचे नेतृत्व आणि नव्या नियुक्त्या
संघटनेच्या राज्य कोअर कमिटीची घोषणा तसेच प्रदेशाध्यक्ष आणि इतर प्रमुख पदांवर नियुक्त्या याच बैठकीत जाहीर होणार आहेत. संघटनेचा पहिला प्रदेशाध्यक्ष कोण ठरणार? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शेतकरी चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, रविकांत तुपकर हे संघटनेच्या नव्या नेतृत्वाची घोषणा करणार आहेत.
मोठ्या आंदोलनाची शक्यता
रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या बैठकीत ते कोणती भूमिका घेतात, कोणते आंदोलन जाहीर करतात आणि त्यांच्या वक्तव्याची काय दिशा असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या उद्देशाने आयोजित या राज्यव्यापी बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.