मुंबई: राज्यातील भाजप-युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या विधेयकाला “अत्याचारी आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे” ठरवत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी आंदोलनाची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या, बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर आंदोलन केले जाणार आहे.
विरोधकांनी आरोप केला की, नक्षलवादाच्या बिमोडासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे कठोर आहेत. त्यामुळे नवीन कायद्याची काहीच गरज नाही. पण सरकार अदानीसारख्या भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून त्यांच्या विरोधात कोणतीही चळवळ, आंदोलन किंवा आवाज उठू नये म्हणूनच हा कायदा आणला जात आहे.
या कायद्यात कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद असून, त्यामुळे तो “काळा कायदा” ठरतो, असा विरोधकांचा आरोप आहे.
हा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी वज्रमूठ केली असून १० सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनानंतर २ ऑक्टोबर रोजीदेखील राज्यात व्यापक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस समितीने दिली आहे.