मुंबई
राज्यभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षाकडून विविध पातळीवर निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटासमोरील आव्हान मोठं आहे. यासाठी आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मंगळवार १६ जानेवारी रोजी विदर्भापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यावेळी विदर्भातील महिलांसोबत त्या संवाद साधतील.
राज्यात अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मोठा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन पुकारलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी तेथे उपस्थिती लावली होती. त्याच पार्श्वभूमीवर महिला आघाडीकडून महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि इतर महिलांशी संवाद साधला जाणार आहे.
मंगळवारी १६ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाबाबत यावेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यत्व करुन विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित करण्यात येतील. त्याचप्रमाणे 2018 साली शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून समोर ठेवली जाईल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडे देखील या सगळ्याची प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे दिले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.