मुंबई : नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेच्या आव्हानांचा विचार करता, नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भाविकांसाठी आधुनिक, पर्यावरणस्नेही आणि सुसज्ज वाहतूक सेवा उपलब्ध होण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्ताव तयार करण्याचेही आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत नाशिक रिंग रोड प्रकल्पाचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, “बाह्यवळण मार्ग, परिक्रमा मार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण यांसाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले पाहिजे. नाशिक विभागीय आयुक्त आणि पालक सचिव यांनी येत्या १० दिवसांत प्राधान्याने हाती घेण्यायोग्य रस्त्यांचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करावा.”
समृद्धी महामार्ग, नाशिक विमानतळ तसेच शहराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले. रस्त्यांसोबतच वाहनतळ निर्माण करणे, वाहतूक नियोजनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यावरही भर देण्यात आला.
नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस सेवा एकात्मिक स्वरूपात राबवण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश देताना मुख्यमंत्री म्हणाले, “वाहतूक आणि शहर विकास यांचा समन्वय साधून नाशिकचा सर्वांगीण विकास करणे हे आपले उद्दिष्ट आहे.”
‘शहरी आव्हान निधी’ अंतर्गत नाशिक शहरातील वाहतूक समस्या आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
नाशिक बाह्यवळण मार्गांतर्गत सुमारे १३७ किमी लांबीचे रस्ते ग्रीनफील्ड अलाइनमेंटद्वारे उभारले जाणार आहेत. यातील ६९ किमीचा जुना मुंबई-नाशिक महामार्ग विभाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारला जाईल. यासाठी ४० गावांमधील सुमारे ५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.