मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाने पिण्याचे पाणी देण्याचे जलजीवन मिशन जाहीर केले. मात्र २०२५ उजाडूनही महाराष्ट्रातील नागरिक पाण्यासाठी तहानलेले आहेत, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या योजनेतील भ्रष्टाचारावर तीव्र हल्ला चढवला.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, “जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोदी सरकारने गाजावाजा केला, पण त्याची अंमलबजावणी ही भ्रष्टाचाराने ग्रासलेली आहे. एका नळाची किंमत ३० हजारांवरून १ लाख ३७ हजारांवर कशी गेली, याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागवले आहे. या योजनेतून फक्त अधिकारी आणि कंत्राटदारांचेच भाग्य फळले.”
ते पुढे म्हणाले, “यवतमाळमध्ये पाणी आणताना एका मुलीचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये महिलांना पाण्यासाठी विहिरीत उतरावे लागते. केंद्र सरकारने आता योजनेच्या निधीत ४७ टक्के कपात केली आहे. त्यामुळे महिलांची वणवण पुढील अनेक वर्षे सुरू राहणार आहे.”