राज ठाकरे म्हणाले – मराठी माणसाच्या अस्मितेचा विजय, ही लढाई पुन्हा पुन्हा लढावी लागेल
मुंबई – इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय अखेर शासनाने मागे घेतला असून, यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आले आहेत. मात्र, ही मागणी केवळ सरकारच्या जाणिवेचा भाग नसून, मराठी जनतेच्या तीव्र विरोधामुळेच ही सक्ती मागे घेण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे म्हणाले, “याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही. सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे अजूनही गूढ आहे. हिंदीसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं, हे जनतेला समजले पाहिजे. मात्र, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर सक्तीने हिंदी शिकवण्याचा जो प्रयत्न होता, तो एकदाचा हाणून पाडला गेला.”
मनसेने उचलला पहिला आवाज, सर्वसामान्यांचा उद्रेक निर्णायक ठरला
या मुद्द्यावर सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून आवाज उठवायला सुरुवात केली होती. त्यानंतर इतर राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनांनीही याला समर्थन दिलं. राज ठाकरे म्हणाले, “मनसेने पक्षविरहित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक पक्ष आणि संघटनांनी यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली होती. हा मोर्चा जर झाला असता, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण आली असती. कदाचित या एकजुटीच्या भीतीमुळेच सरकारने माघार घेतली असेल.”
समितीचा अहवाल काहीही असो, निर्णय कायमचा रद्द झाला पाहिजे
राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला, “सरकारने आता पुन्हा समिती नेमली आहे. मी ठाम सांगतो – समितीचा अहवाल काहीही असला, तरी अशा प्रकारांना आता माफ केलं जाणार नाही. सरकारने कायम लक्षात ठेवावं – ही भाषा सक्ती परत खपवून घेतली जाणार नाही.”
मराठी मनांचा राग पुन्हा दिसला पाहिजे – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी मराठी जनतेचं अभिनंदन करताना म्हटलं, “या लढ्यात मराठी माणूस एकवटलेला दिसला, ही गोष्ट आशादायक आहे. मराठी भाषेसाठी हा राग आणि ही एकजूट पुन्हा पुन्हा दिसली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वावर घाला घालणारे आपलेच लोक आहेत आणि त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे, असंच वाटतं. मराठी माणसाने यावरून बोध घेतला पाहिजे.”
”मराठी ही जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी” – अशी इच्छा व्यक्त
राज ठाकरे यांनी सांगितलं, “मराठी भाषेला केवळ अस्मितेपुरती मर्यादा न राहता, ती ज्ञानाची, तंत्रज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी हीच खरी गरज आहे. आणि त्या दिशेने प्रयत्न करणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”