महाराष्ट्र ताज्या बातम्या

कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याचा सरकारचा विचार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषी विभागाला निर्देश

मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence – AI) प्रभावी वापर करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय साधून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले.

या संदर्भात आज मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत कृषी व सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढत आहे. बदलत्या हवामानामुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असून, अवेळी पडणारा पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांची कमतरता यांसारख्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात एआयचा वापर अपरिहार्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कृषी क्षेत्रात होणारे बदल:
• पीक आरोग्याचे विश्लेषण व पूर्वानुमान
• मातीतील कार्बन आणि पोषणतत्वांचे निदान
• मातीच्या आरोग्याचा सखोल अभ्यास
• तण, कीड व रोगांचा त्वरित शोध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना
• मातीचे तापमान आणि वातावरणातील आर्द्रतेचे मोजमाप
• पूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत अधिक उत्पादनक्षम पद्धतींची अंमलबजावणी
• पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनवणे आणि खर्च कमी करणे

या प्रणालीद्वारे शेती उत्पादन वाढून मजुरी खर्च कमी होणार आहे. तसेच, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावरही नियंत्रण ठेवता येईल. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कापणी प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होईल, परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन अधिक नफा मिळू शकेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

कृषी विभागाने सहकार विभागाच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर एआय प्रकल्प राबवून त्याच्या तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य सरकारकडून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. हवामान बदलाचा शेतीवर होत असलेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, सिंचन प्रकल्प, हवामान आधारित शेती, ड्रोन तंत्रज्ञान आणि स्मार्ट कृषी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

कृषी क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर केल्यास महाराष्ट्रातील शेतकरी अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही होतील. येत्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास पूर्ण करून प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी सुरू करण्याच्या दिशेने सरकार काम करेल, असे संकेत या बैठकीत देण्यात आले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात