Twitter : @therajkaran
मुंबई
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार, असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी केली.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या एल्गार सभेला (Elgar rally) संबोधित करताना वडेट्टीवार बोलत होते. यावेळी वडेट्टीवार भावूक झाले होते. वडेट्टीवार म्हणाले, आजची ही सभा पाहिल्यावर ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. ही ऐतिहासिक सभा आहे. ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही लढत असताना कोणी धमक्या दिल्या तरी आम्ही लढत राहणार. पद येतील जातील. पदापेक्षा समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देणे महत्वाचे आहे.
३५० जातीचा समाज कसा जगतो, कोणत्या अवस्थेत जगतो, हे पाहिल्यावर समाजाचे दुःख कळेल. जमिनी कमी झाल्या म्हणणाऱ्यांनी जमिनी नसलेल्या समाजाचा विचार केला पाहिजे. 20 एकर, 50 एकर जमीन असलेला शेतकरी 5 एकरावर आला असेल, मात्र ज्याला 2 एकर सुद्धा जमीन नाही, तो शेतकरी 20 पिढ्यात कुठे असेल याचा विचार केला पाहिजे. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखे वागले पाहिजे. दहशत, भीती दाखवून घाबरून सोडणे योग्य नाही. घर जाळण्यापर्यंत टोकाचा द्वेष पसरवला जात आहे. द्वेष आणि विष पेरण्याचे काम कोणी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वडेट्टीवार म्हणाले, एका छोट्या जातीचा ओबीसी कार्यकर्ता आज समोर आला आहे. मंत्री होतो तरी कधी चिंता केली नाही. आजही चिंता करत नाही. अंबडची ही सभा तुंबड झाली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात सभा घ्यावी लागेल. अनेक वर्ष काम केले. कधी घाबरलो नाही. वेदना, दुःख झाल्याने ते मांडण्यासाठी सर्वपक्षीय नेते जमले आहेत. सर्वांनी मिळून केंद्राकडे जातीनिहाय जनगणनेची (caste census) मागणी केली पाहिजे. ‘जिस की जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी! असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.