महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील इंदापूर ते पेण हा पट्टा सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या ताब्यात गेला आहे. सर्विस रोड, उड्डाणपूल आणि मुख्य रस्ता — सर्वच ठिकाणी खड्ड्यांनी वाहतूकधारकांचे कंबरडे मोडले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे म्हणजे जणू तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
या महामार्गावर केवळ रस्त्यांचीच नव्हे, तर वाहतुकीच्या सुरक्षेचीही दयनीय स्थिती आहे. पाळीव जनावरे व मोकाट कुत्र्यांचा रस्त्यावर मुक्त संचार वाढल्याने अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दोन्ही बाजूंना बंदिस्त कुंपण नसल्यामुळे आसपासच्या गावांतील जनावरे महामार्गावर येतात आणि अचानक वाहनांसमोर येतात, परिणामी गंभीर अपघात घडतात.

महाडपासून माणगाव आणि पुढे इंदापूर ते पेण दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्त्यांनाही तडे गेले असून, ठिकठिकाणी उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे गणपतीसारखा मोठा सण अवघ्या दीड महिन्यावर असताना कोकणात येणाऱ्या लाखो भाविकांची वाहतूक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने अद्यापही या खड्ड्यांवर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. ‘हे खड्डे नेमके कधी भरले जाणार?’ असा सवाल रोजच प्रवासी व स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. इतक्या वर्षांपासून काम चालू असलेला हा महामार्ग अजूनही पूर्ण का झालेला नाही, हा प्रश्न कोकणवासीयांना पडतो आहे.
महामार्ग सुरक्षा गस्त पथकाची भूमिकाही संशयास्पद ठरत आहे. कशेडी, केभुर्ली आणि नागोठणा येथे तैनात असलेले गस्त पथक केवळ वाहनांची तपासणी करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत वरिष्ठांना अहवाल देण्याची गरज ते का समजत नाहीत? रोज कोणत्या भागात किती खड्डे आहेत, कोणती ठिकाणे अधिक धोकादायक आहेत यावर दैनंदिन अहवाल मागवण्याची यंत्रणा का नाही?
अशा परिस्थितीत वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांना त्रास देणाऱ्या तपासणीच्या कारवायांपेक्षा, महामार्गाची दुरुस्ती आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. अन्यथा, अपघात वाढतच जातील आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरितच राहील.