Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार असून या संदर्भातील शासनाने काढलेल्या जीआरची शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रदेश कार्यालयासमोर होळी करण्यात आली. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख म्हणाले की, सरकारने जो कंत्राटी भरतीचा जीआर काढला आहे, तो तरूणांचे रोजगार धोक्यात घालणारा आहे. तरुण पिढीच्या भविष्यासोबत राज्य सरकार खेळत आहे. त्यामुळे या जीआरची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने होळी करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा जीआर तातडीने रद्द करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी राज्य सरकारला देण्यात आला.
हे कंत्राट कुणासाठी काढले आहे? क्रिस्टल कंपनी कुणाची आहे? कोणाला लाडाने प्रसाद दिला आहे? असा सवाल करत मेहबूब शेख म्हणाले, भाजपच्या लोकांच्या हातात तुम्ही तरूणाचे भविष्य देत आहात. याचा आम्ही निषेध करतो. भाजपने सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार, असे म्हटले होते. मात्र सरकार रोजगार आणि सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यापेक्षा आता कंत्राटी पद्धतीवर नोकऱ्या देत आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य तरुणाचे स्वप्नही राज्य सरकारने पायाखाली तुडवले असून हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांचे सरकार नाही आहे. केवळ उद्योगपती आणि कंत्राटकदाराचे स्वप्न पूर्ण करणारे सरकार असल्याचा आरोपच त्यांनी यावेळी केला.