महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवनार डम्पिंगवरून तापले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण…!

आदित्य ठाकरे व अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यात थेट जुंपली

मुंबई – मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल ₹२,३६८ कोटींची निविदा काढल्याने, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. दोन दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी या निविदेवर टीका करत, “ही जमीन अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव आहे,” असा गंभीर आरोप केला होता. यावर संतप्त प्रतिक्रिया देत मुंबई भाजप अध्यक्ष व राज्याचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज सोशल मीडियावरून ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.

शेलार म्हणाले, “मुंबईकरांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात घालणाऱ्या देवनार डम्पिंगच्या प्रश्नावर भाजपने गांभीर्याने पावले उचलली आहेत. मात्र, गेल्या पंचवीस वर्षांत या कचऱ्यावरून कमिशन खाऊन गलेलठ्ठ झालेल्या काही राजकीय गिधाडांनी पुन्हा आपली चोच उघडली आहे.”

शेलार यांनी ठाकरेंच्या पक्षाच्या भूतकाळाची आठवण करून दिली. “२००८ मध्ये, जेव्हा शिवसेनेची सत्ता पालिकेत होती, त्यावेळी याच कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ₹४,५०० कोटींची निविदा काढण्यात आली होती. आम्ही त्यावेळी सत्तेत असूनही त्या निविदेचा प्रखर विरोध केला होता. मात्र आमचा विरोध झुगारून ती निविदा मंजूर केली गेली. त्याचे काय झाले? मुंबईकरांना अजूनही दुर्गंधी, प्रदूषण आणि श्वसनाचे विकार भोगावे लागत आहेत.”

“आता, आम्ही जेव्हा खरोखर काहीतरी उपाय करत आहोत, तेव्हा हेच लोक निविदेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ४५०० कोटींचा हिशोब द्यायचा कोणी? आणि आज २३६८ कोटी खर्चून जेव्हा समस्या सोडवायचा प्रयत्न होतो आहे, तेव्हा टीका केली जाते,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

शेलार म्हणाले, “देवनार डम्पिंग ग्राउंड आणि धारावी पुनर्विकासप्रकल्प एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र, यामध्ये एक इंच भूमीही अदानीच्या घशात जाणार नाही. उलट, धारावीतील रहिवाशांना घरे, शाळा, मैदानं, बागा मिळणार आहेत आणि महापालिका व शासनालाही महसूल मिळणार आहे. तरीही आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा विरोध का?

शेवटी, शेलार यांनी ठामपणे सांगितले की, “देवनारच्या दुर्गंधीत फक्त कचऱ्याचा नव्हे, तर गेल्या दोन दशकांच्या अपयशी कारभाराचा आणि राजकीय पाखंडीपणाचाही वास दरवळत आहे.”

मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि नागरी सुविधांशी संबंधित असलेल्या या मुद्द्यावरून सुरू झालेले भाजप विरुद्ध उध्दव गटाचे हे नव्याने पेटलेले युद्ध किती काळ रंगेल आणि त्यातून मुंबईकरांना काय मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात