पोलिस-आरटीओच्या ‘आशीर्वादाने’ अपघातांना आमंत्रण!
महाड : कोकणातील औद्योगिक क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या दगडी कोळशाची अवजड वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. वाहनांच्या मूळ रचनांमध्ये फेरफार करून जास्तीत जास्त कोळसा भरून मुंबई-गोवा महामार्गावरून ही वाहतूक सुरू आहे. मात्र, रस्त्यावर सतत तैनात असलेले परिवहन (RTO) आणि पोलिस प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने ही वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अपघात झाले, मृत्यूही झाले, तरी कारवाई नाही!
या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे यापूर्वी अनेक अपघात झाले असून काहींचा जीवही गेला आहे. तरीदेखील संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांचा आणि काही पोलिस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.
नागोठणे ते कशेडी – पोलिसांचा दुजाभाव?
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे, नागोठणे, महाड, केभुर्ली, कशेडी इत्यादी ठिकाणी वाहतूक पोलिसांचे तपासणी नाके आहेत. मात्र येथे फक्त खासगी कार, दुचाकीस्वार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस यांचीच तपासणी होते. कोळसा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मात्र ‘रेड कार्पेट’ वाट दिला जातो.
या दुजाभावामुळे पर्यटक व सामान्य वाहनचालक त्रस्त असून, “कोळसा ट्रक थेट सोडतात, आणि आमच्यावर गडबड” अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
कोळसा नागोठणेहून येतो, ‘कमाई’ कुणाची?
बॉयलरसाठी लागणारा दगडी कोळसा मालगाडीतून नागोठणे येथे उतरवला जातो. तिथून महाड, खेड, चिपळूण व रत्नागिरीसह औद्योगिक भागात तो ट्रकने पाठवला जातो. हे ट्रक ओव्हरलोड असतात आणि त्यातून लाखोंची ‘कमाई’ होत असल्याचे बोलले जाते. वाहतुकीची क्षमता निश्चित असूनही वाहनांमध्ये फेरबदल करून अधिक माल भरला जातो, ही सरळसरळ कायद्याची पायमल्ली आहे.
शासनाने लक्ष घालावे – जनतेची मागणी
वाहतुकीच्या या बेफाम प्रकारामुळे कोकणातील रस्ते अपघातप्रवण झाले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ लक्ष घालून RTO आणि वाहतूक पोलिसांची जबाबदारी ठरवावी, तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोकणवासीयांनी केली आहे.