राज्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
X: @therajkaran
मुंबई: प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाची जी टक्केवारी जाहीर करण्यात येते ती कच्ची असते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी एंड ऑफ पोलची जी आकडेवारी देण्यांत येते ती अंतिम असते. ती सर्वच राजकीय पक्षांच्या पोलिंग एजेंटना देण्यात येवून पडताळून पाहण्यात येते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक असून यात काहीही गोपनीय नसल्याचा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.
राज्यात उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा प्रत्यक्ष मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून मतदारांच्या आरोग्याची काळजी राखण्यासाठी सर्वच मतदान केंद्रांवर थंड पाणी व ओ आर एस या उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी व्हिटॅमिन युक्त पावडरची पाकिटही ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यानंतर ११ दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर ४ दिवसांनी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी ही आधी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीपेक्षा ३ ते ५.७५ टक्के अधिक असल्याने ती संशयास्पद असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे, असे विचारता, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जी टक्केवारी जाहीर करण्यात येते ती ढोबळ स्वरूपाची असते. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री एंड ऑफ पोल आकडेवारी येते ती अंतिम असते. तसेच मतदानाच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या पोलिंग एजेंटसना फॉर्म १७ क नुसार संबंधित मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची अचूक आकडेवारी देण्यांत येते. ही आकडेवारी त्याचवेळी सीलबंद करण्यात येते. त्यात कोणतीही गोपनीयता नाही. त्यामुळे आता झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत नंतर अचानक वाढ झाली असे कोणीही म्हणू शकणार नाही, असे चोक्कलिंगम म्हणाले.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २०१९ च्या तुलनेत सरासरी इतकेच मतदान झाले आहे, तरं दुसऱ्या टप्प्यात त्यात ०.२१ टक्के इतकीच वाढ नोंदविण्यात आल्याचे चोक्कलिंगम यांनी नमूद केले.
ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरील आक्षेप योग्यच…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाच्या गीतावरील जय भवानी या शब्दावर निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेला आक्षेप योग्यच असून त्यांनी आता आयोगाविरोधात जरी आव्हानात्मक भूमिका घेतली असेल तरी त्यांनी या आक्षेपावर पुनर्विचार करण्यात यावा अशी विनंती केली होती. मात्र संबंधित समितीने हा आक्षेप योग्यच असल्याचा निर्वाळा दिल्याने आता ते अपिलेट कमिटीकडे पुनर्विचारासाठी याचिका करु शकतात असेही अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी आचारसंहितेच्या काळात राजकीय बैठका झाल्याची तक्रार केली होती. पण आयोगाने केलेल्या तपासानंतर अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे आयोगाला आढळले असून आता सावंत यांच्याकडे काही पुरावे आहेत का अशी उलट विचारणा कुलकर्णी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली.
उन्हाळ्याच्या तडाखापासून मतदारांना संरक्षण….
राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदारांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी आयोगाचा प्रयत्न राहणार असून मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर सावलीसाठी मंडपाची व्याप्ती वाढविणे, रिकाम्या खोल्या उपलब्ध असल्यास वेटींग रूम तयार करून मतदारांना टोकनची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा आवश्यक तो पुरवठा शिवाय मतदानाची वेळ ६ वाजेपर्यंत असते. पण प्रत्यक्षात संध्याकाळी ६ नंतर जितके मतदार मतदान केंद्र परिसरात प्रवेश करतील त्यांना रात्री कितीही वाजले तरी मतदान करता येईल याची ठाम ग्वाहीही एस. चोक्कलिंगम यांनी अखेरीस दिली.