X : @ajaaysaroj
शेवटपर्यंत सस्पेंस कायम राखलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात (Palghar Lok Sabha constituency) महायुतीने अखेर डॉ हेमंत विष्णू सावरा या उच्च विद्याभूषित उमेदवाराच्या गळ्यात माळ घातली आहे. त्यामुळे आता येथे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) भारती कामडी, बविआचे (BVA) राजेश पाटील आणि महायुतीचे (Maha Yuti) डॉ सावरा अशी चुरशीची तिरंगी लढत इथे रंगणार आहे.
केवळ खासदारकीचे तिकीट मिळवायचे या एकमेव उद्देशाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजपने तिकीट नाकारण्याचे शहाणपण दाखवले आहे. अर्थात त्यांचे योग्य पुनर्वसन करू असे सांगायला भाजपचे नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण विसरलेले नाहीत. डॉ हेमंत सावरा हे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिशय निकटचे मानले जाणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत. कायमस्वरूपी आरोग्याच्या समस्या भेडसावत असणाऱ्या पालघर सारख्या सागरी , नागरी व डोंगरी अश्या तीन भागात विभागलेल्या लोकसभा मतदारसंघात एम डी असलेल्या डॉक्टर हेमंत यांना उमेदवारी देऊन भाजपने या मतदारसंघात चांगला संदेश दिला आहे. आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने हा मतदारसंघ नेहमीच आरोग्य विषयक बातम्यांनी गाजत असतो. मुंबईच्या एवढ्या जवळ असूनही येथील कुपोषणाची समस्या दुर्दैवाने अजूनही संपलेली नाही. भाजपकडे या मतदारसंघात स्वतःची वोट बँक आहे. अर्थात तशीच ती शिवसेनेकडे देखील आहे, मात्र आता शिवसेना महाफुटीनंतर किती प्रमाणात येथे उबाठाला मतदान होते आणि किती प्रमाणात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे , म्हणजेच महायुतीच्या डॉ सावरा यांना होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपचे या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चांगले नेटवर्क आहे. या नेटवर्कवरच भाजपची मदार असणार आहे.
शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर या लोकसभा मतदारसंघात उबाठा गटावर मतं मिळवण्यासाठी ज्यांना शिवसेनेच्या स्थापनेपासून कट्टर शत्रू म्हणून बघितले , त्या कम्युनिस्टांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बोईसर येथील सभेला उद्धव ठाकरे यांच्या समोर अत्यल्प प्रमाणात असलेल्या भगव्या झेंड्याऐवजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कम्युनिस्टांचा , म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी भाषेत लाल माकडांचा लाल झेंडा फडकत होता. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला असणारी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघून कॉम्रेड कृष्णा देसाई व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा नक्कीच धन्य झाला असेल अशी या सभेला आलेली बाळासाहेबांच्या शिवसेनेला मानणारी जुनी मंडळी बोलत होती. त्यामुळे हिंदुत्ववादी भाजपला हरवण्याचा एकमेव उद्देश ठेवून ही कम्युनिस्ट मतं उबाठा गटाच्या भारती कामडी मशाल चिन्हावर कितपत वळवू शकतात यावरही उबाठा गटाचे ,महाविकास आघाडीचे गणित अवलंबून आहे.
बहुजन विकास आघाडीने विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. बविआची इथे स्वतःची जवळपास पाच लाखाच्या घरात मतं आहेत. २०१४ ला बविआच्या बळीराम जाधव यांनी २,९३,६८१ इतकी तर भाजप सेना युतीच्या चिंतामण वनगा यांना ५,३३,२०१ इतकी मतं मिळवली होती. चिंतामण वनगा यांच्या दुर्दैवी निधनानंतर झालेल्या २०१८ च्या पोटनिवडणुकीत बविआच्या जाधव यांना २,२२,८३८ इतकी मतं मिळाली होती व शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढले असताना एकसंघ शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना २,४३,२१० तर भाजपच्या राजेंद्र गावित यांना २,७२,७८२ इतकी मतं मिळाली होती. मात्र २०१९ ला नरेंद्र मोदी नावाची प्रचंड मोठी लाट असूनही याच बविआच्या जाधव यांनी परत ४,९१,५९६ इतकी घसघशीत मतं घेतली होती. युतीने विजय मिळवला असला तरी एकसंघ शिवसेना आणि भाजप अशी युती असताना देखील बविआच्या उमेदवाराने शिवसेना भाजपच्या तोंडाला फेस आणला होता हे मान्य करावेच लागेल.
त्यामुळे आता शिवसेना फुटल्या नंतर या मतदारसंघात काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याजोडीने निवडणूक लढवताना उबाठा गटाला संपूर्णपणे कम्युनिस्ट मतांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. कारण समोर भाजपचा उमेदवार आहे आणि त्याच्या जोडीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहेच , पण बविआच्या राजेश पाटील यांच्या रूपाने आणखीही एक तगडा उमेदवार आहे. या लोकसभा मतदारसंघात तब्बल तीन आमदार हे बविआचे आहेत हे विसरून चालणार नाही. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांना मिळत असलेल्या मतांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाफुटीनंतर विभागणी होणार आहे. या दोन मतदारसंघात एकनाथ शिंदे व अजित पवार कितपत मतं खेचू शकतात आणि उद्धव ठाकरे व शरद पवार किती मतं राखू शकतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांच्या मतदारसंघातून मिळणाऱ्या मतांवर महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांचे गणित अवलंबून आहे.
बविआचे उमेदवार राजेश पाटील ,त्यांच्या पाठीशी असणाऱ्या तीन आमदारांच्या मतदारसंघातील मतांवर आणि बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या करिष्म्यावर स्वतःचे वेगळे गणित मांडून या दोन्ही मोठ्या पक्षांच्या उमेदवाराला धूळ चारतात, की त्यांच्या उमेदवारीमुळे महायुती किंवा महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मदत होते हे चार जुनलाच स्पष्ट होणार आहे.