मुंबई : “नरकातील स्वर्ग” हे पुस्तक प्रकाशित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ज्या शैलीत आत्मकथन मांडले, त्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
शनिवारी एका पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले, “२०१९ मध्ये जर त्यांच्या नेत्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकनिष्ठता राखली असती, तर आज त्यांना ‘नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ’ आली नसती!” — अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला.
शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातील देशसेवेची तळमळ ओळखून त्यांना पाठिंबा दिला होता. पण आज जे काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले आहेत, त्यांना बाळासाहेबांचा हेतू समजणे शक्य नाही.” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा, शिवसेनेला नवे बळ
त्याच दिवशी ठाण्यातील महापौर निवासस्थानी शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर पक्षातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदेंनी सर्वांचे जाहीर स्वागत करत “हा विश्वास मी सार्थ ठरवीन,” असे ठाम आश्वासन दिले.
पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे, ग्रीको-रोमन केसरी संग्राम बाबर, तसेच अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपत गुजर, भालचंद्र पवार यांचाही पक्षप्रवेश झाला.
नमेश बाबर यांनी यावेळी “कात्रज परिसराच्या विकासासाठी आमच्याकडे स्पष्ट आराखडा आहे. वाहतूक कोंडी आणि पाणीटंचाई सोडवण्यासाठी शिंदे साहेबांकडून सहकार्य मिळेल याची खात्री आहे,” असे सांगितले.
या पक्षप्रवेशाने शिवसेनेला ग्रामीण आणि क्रीडा क्षेत्रात नवे बळ मिळाले असून, यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अधिक आत्मविश्वासात असल्याचे चित्र दिसले. उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव राम रेपाळे, रणजीत पायगुडे, आणि इतर प्रमुख पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.