Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी (repayment of debt) अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण राज्यातील भाजपा सरकारला त्याची लाज वाटत नाही, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, राज्यातील काही भागात ओला दुष्काळ पडला आहे तर काही भागात कोरडा दुष्काळ (drought) पडला आहे, शेतमालाला भाव नाही, सोयाबीन, कापूस, डाळी, कांद्यासह भाजीपाला व फळभाज्यांना भाव नाही, कर्जाचा डोंगर उभा आहे, पीकविम्याचे (crop insurance) पैसे मिळत नाहीत आणि मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र शेतकऱ्यांना भरघोस मदत केल्याच्या पोकळ घोषणा करत आहेत. अवकाळीच्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, कर्जमाफीतील प्रोत्साहनपर ५० हजार रुपयेही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. सरकारचे अधिकारी-कर्मचारीच ५० पैशांची आणेवारी दाखवतात, मग दुष्काळ कसा जाहीर करणार? सरकारने दुष्काळ जाहीर करण्यातही राजकारण केले. सरकारी खरेदी केंद्रेही सुरु झालेली नाहीत. ‘शासन आपल्या दारी’ म्हणत जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. यावर्षीचे खरीप वाया गेला, पिकं शेतातच करपून गेली आता रब्बीही हातातून गेल्यात जमा आहे. पेरणीचा खर्चही निघत नाही ही अवस्था आहे. सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी (anti-farmers BJP government) हे सातत्याने स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सरकारला नेहमीच जाब विचारला पण हे आंधळे, बहिरे, गेंड्याचे कातडीचे सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी हा या सरकारचा प्राधान्यक्रमच नाही. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही. हेलिकॉप्टरने शेतात जाऊन आपण शेतकरीच असल्याचा देखावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) करत असतात. पण ते भाग्य राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या नशिबी नाही, लाखभर रुपयांच्या कर्जासाठी त्यांच्यावर अवयव विकण्याची वेळ आली आहे. उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे भाजपा सरकार माफ करते पण गरिब शेतकऱ्यांचे लाख-दोन लाखांचे कर्ज माफ करु शकत नाही, त्यांना आर्थिक मदत करु शकत नाही. हिवाळी अधिवेशनात (Winter session) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नीही भाजपा सरकारला जाब विचारु, असे नाना पटोले म्हणाले.