रुग्णांसाठी महानगरपालिका रूग्णालयांमध्ये विशेष खाट आणि विशेष कक्षांची व्यवस्था
के. ई. एम. रूग्णालयातील मृत्यू कोविडमुळे नाही; गंभीर सहव्याधींमुळे झाले असल्याचे तज्ञांचे मत
मुंबई: कोविड-१९ आजार आता एक प्रस्थापित (endemic) आणि सतत चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणला जात आहे. विषाणू वस्ती पातळीवर स्थिरावल्यामुळे, कोविड रुग्ण अधूनमधून अत्यंत कमी प्रमाणात आढळतात. सध्या सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविड रुग्णसंख्या वाढल्याचे आढळले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य खाते कोविड-१९ प्रादुर्भावावर सतत लक्ष ठेवत आहे. जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ पर्यंत कोविड रुग्ण संख्या खूपच कमी होती. मे महिन्यात काही प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम) रुग्णालयात कोविड बाधित १४ वर्षांची मुलगी आणि ५४ वर्षीय महिला रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. परंतु, हे मृत्यू कोविडमुळे नव्हे, तर गंभीर सहव्याधींमुळे (Nephrotic सिंड्रोम, Hypocalcemic seizures, कॅन्सर) झाले असल्याचे तज्ञांनी निश्चित केले आहे. या रुग्णांचा मूळ पत्ता मुंबईबाहेरील सिंधुदुर्ग व डोंबिवली येथे आहे.
कोविड-१९ ची लक्षणे:
• ताप
• कोरडा किंवा कफयुक्त खोकला
• घसा खवखवणे किंवा दुखणे
• थकवा, अंगदुखी, डोकेदुखी
• सर्दी, नाक वाहणे
• चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे
• श्वास घेण्यात त्रास (गंभीर लक्षण)
ही लक्षणे अनेकदा सामान्य सर्दीसारखी वाटू शकतात, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. गंभीर आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना (उदा. कर्करोग, वृद्ध व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृत आजार) विशेष खबरदारी घ्यावी.
उपचार:
कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोविड-१९ प्रतिबंधासाठी नागरिकांसाठी सूचना:
• लक्षणे आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे
• सामाजिक अंतर राखणे
• हात स्वच्छ करण्यासाठी वारंवार साबण व पाण्याने हात धुणे
• योग्य आहार व विश्रांती घेणे
महानगरपालिकेची सुविधा:
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड-१९ रुग्णांसाठी उपचार व मार्गदर्शन उपलब्ध आहे.
• सेव्हन हिल्स (Seven Hills) रुग्णालयात २० MICU खाट, २० खाट मुले व गरोदर स्त्रियांसाठी, तसेच ६० सामान्य खाट उपलब्ध आहेत.
• कस्तुरबा रुग्णालयात २ ICU खाट व १० खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार ही क्षमता वाढवली जाईल.
कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन उपचार करावेत. स्वतःहून औषधे घेणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.