मुंबई : “दहशतवादी हल्ल्यांचा मुद्दा हा केवळ राजकीय लाभासाठी वापरण्याचा भाजपाचा प्रयत्न उघड झाला आहे,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजप व त्याच्या मित्र पक्षांकडून ‘विजयोस्तव’ साजरे केले जात आहेत. मात्र दहशतवाद्यांवर प्रत्यक्षात कारवाई झाली नाही आणि दोन दिवसांतच युद्धविराम जाहीर केला गेला, हे वास्तव लक्षात घेत अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले आहेत.
या पत्रात ठाकरे म्हणतात, “दहशतवाद्यांना शोधून त्यांच्या दहा पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा करण्याऐवजी, युद्धाच्या नावाखाली केवळ राजकीय फायदे घेतले जात आहेत. युद्धाचा निकाल लागलेला नसतानाही विजयाचा जल्लोष करणे हे शहिदांप्रती अन्यायकारक आहे.”
ते पुढे म्हणतात, “पाकिस्तानच्या इतिहासावरून स्पष्ट आहे की, त्यांच्यावर पूर्णतः विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांना सजग ठेवणे, त्यांना युद्धजन्य परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन करणे आणि मानसिक तयारी करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
अमित ठाकरे यांनी पत्रात आणखी एका मुद्द्यावर भर दिला आहे की, “विजयोत्सवाच्या नावाखाली जे उपक्रम साजरे होत आहेत, ते समाजात भावनिक संभ्रम निर्माण करत आहेत. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविरामाची आहे. अशावेळी संयम बाळगणे आणि जनतेत सजगता, साक्षरता निर्माण करणे हेच खरे राष्ट्रप्रेम आहे.”
अखेर, त्यांनी नमूद केले की, “दहशतवादी हल्ल्याचे खरे प्रत्युत्तर तेव्हाच मानले जाईल, जेव्हा पहलगाम हल्ल्याचे दोषी दहशतवादी नेस्तनाबूत होतील आणि देशातील स्लीपर सेल्सची पूर्ण माहिती मिळवून ती मोडीत काढली जाईल. त्या दिवशी भारताचा खरा विजयोस्तव साजरा होईल आणि संपूर्ण देश स्वतःहून रस्त्यावर उतरून जल्लोष करेल.”
राजकीय परिपक्वतेची आणि राष्ट्रीय हिताची बाजू मांडणाऱ्या अमित ठाकरे यांच्या या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. यावर भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची प्रतिक्रिया काय येते, याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.