By योगेश त्रिवेदी
मुंबई : “रायगड समजून घ्यायचा असेल, तर तो फक्त शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त राजू देसाई यांच्याकडूनच,” अशा शब्दांत सत्तरीतील ज्येष्ठ शिवप्रेमींनी राजू देसाई यांच्या कार्याचा गौरव केला.
‘मल्ल्या-वराडकर फ्रेंड्स क्लब’ च्या ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ सभासदांनी राजू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड भ्रमंती केली. कडक उन्हातही, या वयोवृद्ध शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचे बारकाईने आणि अत्यंत आस्थेने दर्शन घेतले.
राजसदरात, शिवराज्याभिषेकाचे वर्णन जेव्हा राजू देसाई यांनी अत्यंत जिवंत शैलीत केले, तेव्हा ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी दरबार दुमदुमून गेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह स्पष्टपणे झळकत होता.
काही ज्येष्ठांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राजू देसाई आणि रायगड हे एक अविभाज्य समीकरण आहे. रायगड पाहायचा आणि त्याची माहिती घ्यायची, तर ती फक्त राजू देसाई यांच्याकडूनच.” राजदरबारातील माहिती ऐकताना, गडावरील इतर पर्यटकही मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनीही घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
विशेष म्हणजे, ही राजू देसाई यांची ५०३ वी रायगड फेरी होती. “आम्हाला त्यांच्या या ऐतिहासिक फेरीत सहभागी होता आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. लवकरच त्यांची १००० वी फेरी पूर्ण होवो, हीच मनोकामना,” असे सत्तरीतील ज्येष्ठ शिवभक्तांनी नमूद केले.