मुंबई : “महाराष्ट्राचे सुपुत्र आज देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. त्यांचे स्वागत प्रोटोकॉलनुसार व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यांना भाड्याची गाडी दिली जाते. हे केवळ दुर्लक्ष नसून, त्यांच्या ‘संविधान सर्वोच्च आहे’ या स्पष्ट विचारामुळे सरकारने ही वागणूक दिली काय?” असा थेट आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे केला.
“कार्यपालिका आणि न्यायपालिकेपेक्षा श्रेष्ठ असलेले संविधान जेंव्हा एखादी व्यक्ती उघडपणे सांगते, तेव्हा त्या विचारांशी असहमत असलेले सरकार अशा व्यक्तीला दुर्लक्षित करत आहे काय?” असा सवाल करत दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत उत्तर मागितले आहे.
“विरोधी पक्षाच्या लोकांचा अपमान हा महायुती सरकारचा अजेंडा बनला आहेच. पण आता सरन्यायाधीश महोदयांनाही त्याच चष्म्यातून पाहत आहात काय?” असा खोचक सवाल करत दानवे यांनी ही वागणूक लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात शासकीय प्रोटोकॉलचे पालन न झाल्याची बाब सध्या वादाचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.