IFS अधिकाऱ्यांशी संवादात मुंबईच्या भविष्यातील आर्थिक व शैक्षणिक रूपरेषेची मांडणी
मुंबई : मुंबईच्या पायाभूत सुविधा, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आगामी प्रकल्पांमुळे नव्या आर्थिक युगाची सुरुवात होणार आहे. वाढवण बंदर, एड्यु सिटी, नॉलेज सिटी यांसारख्या भव्य योजनांमुळे मुंबई देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावर एक प्रभावशाली आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘करिअर ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत सोमवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 2013-14 च्या बॅचमधील भारतीय विदेश सेवेतील (IFS) 14 अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
या संवादादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आगामी धोरणांची माहिती देताना सांगितले की, वाढवण बंदर हे JNPT पेक्षा तीनपट मोठे असणार असून ते भविष्यात जगातील टॉप 10 बंदरांमध्ये स्थान मिळवेल. या बंदराच्या विकासातून पुढील 20 वर्षात महाराष्ट्रात एक नवी अर्थव्यवस्था उभी राहील.
त्याचप्रमाणे मुंबईत 200 एकरमध्ये एड्यु सिटी, 300 एकरमध्ये इनोव्हेशन सिटी आणि 1000 एकरमध्ये नॉलेज सिटी उभारली जाणार आहे. एड्यु सिटीमध्ये देशातील 12 नामांकित विद्यापीठे असून सुमारे 1 लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेतील. या प्रकल्पांमुळे मुंबई केवळ आर्थिक नव्हे तर जागतिक दर्जाचं ज्ञानकेंद्र म्हणूनही उदयास येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोस्टल रोड, अटल सेतू, तिसरी मुंबई यांसारख्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांची माहितीही अधिकाऱ्यांना दिली.
IFS अधिकाऱ्यांशी संवादादरम्यान परराष्ट्र धोरणातील महाराष्ट्राचा सहभाग, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या संधी, राज्यातील विदेशी सहकार्याचे प्रकल्प आणि ‘विकसित भारत’ दृष्टिकोनात महाराष्ट्राची भूमिका यावरही सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस अप्पर मुख्य सचिव, सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.