मुंबई
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भव्य पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत आधी वकील असीम सरोदे यांनी भूमिका मांडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालात नेमकं काय-काय चुकलं याबाबतचं विश्लेषण त्यांनी केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनीही या प्रकरणातील आपलं मत मांडलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात ‘लबाडा’ने जो निकाल दिला, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहोत. त्यांच्याकडून शेवटची आशा आहे. आज जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. सरकार कोणाचंही असलं तर सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे –
- माझं तर आव्हान आहे, नार्वेकर, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेसमोर उभं राहू. यावेळी पोलीस सुरक्षा घेऊ नये आणि त्यावेळी नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची, आणि जनतेने सांगावं.
- आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंधे उच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय अध्यक्षांकडे दिला होता. आमचा व्हिप आमचाच असेल. व्हिप हा लाचाऱ्याच्या हाती शोभत नाही. तुम्ही शिवसेनेचे अध्यक्ष होणार, लायकी आहे का?
- आपण निवडणूक आयोगावर केस करायला हवी, कारण त्यावेळी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तब्बल १९ लाख प्रतिज्ञापत्र पुरवली होती. जर आयोगाला निकाल देता येत नसेल तर आमचे पैसे परत द्या.
- २०१८ साली इथंच वरळीतच राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडून झाली होती. आज आम्हाला गिळलं असं वाटत असेल, मात्र उद्याची अवस्था काय असेल पाहा…
- मला सत्तेचा मोह नव्हता, म्हणून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी राज्यपालांनी जे अधिवेशन बोलावलं ते असंविधानिक होतं.
- ही फक्त शिवसेना, उद्धव ठाकरेंची लढाई नाही, तर या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही याची लढाई. सर्वोच्च न्यायालयाचं वर्चस्व, अस्तित्व राहणार की नाही?
- विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निकाल देतील असं वाटत होतं. निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. ते आमची घटना गिळून बसले. हा मोठा कट.
- २०२२ साली जे पी नड्डा इथं आले होते. ते म्हणाले होते, की देशात एकच भाजप हा पक्ष राहणार. बाकीचे सर्व पक्ष संपतील. तिथून कटाला सुरुवात झाली, यात सर्वांचा समावेश.
- ज्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्या महाराष्ट्रापासून त्यांनी लोकशाहीच्या हत्येला सुरुवात केली. मात्र त्यांना माहित नाही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम काय आहे. ही माती त्यांना गाडून टाकते.
- आमची घटना मान्य नसेल तर २०१९ ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलावलं होतं. महनिय अध्यक्ष अमित शहा माझ्याकडे आले होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल नकार दिला. पाठिंबा घ्यायला यायला तुम्हाला लाज वाटली नाही. २०१४ साली लोकसभेत शिवसेनेचा पाठिंबा घ्यायला आलात. त्यानंतर ऑक्टोबरला ती तोडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगलं.