नवी दिल्ली
2024 हे निवडणुकीचं वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याने उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालावरही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
इंडिया आघाडीचा चेहरा कोण?
पुढील वर्षी एप्रिल किंवा मे मध्ये लोकसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा ठऱवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्वानुमते यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्याही डोक्यात काही विषय आणि नावं आहेत, बैठकीत ते मांडण्यात येतील असंही पुढे ठाकरे म्हणाले.