नाशिक
आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि महाआरती केली. काळाराम मंदिराचा इतिहास मोठा आहे. याच मंदिराच्या माध्यमातून दलितांना मंदिर प्रवेशाचं मोठं आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलं होतं. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी हिंदू मंदिरात दलितांना प्रवेश देण्याच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.
उद्धव ठाकरेंनी २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात महाआरती करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतलं होतं. आज उद्धव ठाकरे पत्नी रश्मी आणि सुपूत्र आदित्य, तेजस ठाकरे यांच्यासह काळा राम मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षच पणाला लागला असल्याने काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जनता न्यायालय भरवलं होतं. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप केला, यावेळी त्यांनी विधीतज्ज्ञाना बोलावून कायदा समजावून सांगितला. अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं नव्हतं. यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. अयोध्येच्या राम मंदिर उभारणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी आंदोलनाची जबाबदारी घेतली होती.