मुंबई
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण आज मंगळवारपासून सुरू होणार असून पुढील तीन दिवस चालणार आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेचे कर्मचारी (BMC employees) आणि अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही हे काम करावे लागणार असल्याने आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
२३ ते २५ जानेवारी असे तीन दिवस सर्वेक्षण चालणार आहे. त्यानंतर सलग ३ दिवस सुट्टी आहे. परिणामी सहा दिवस प्रशासकीय कामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालयांतील ७५ टक्के कर्मचारी व अधिकारीही तीन दिवस सर्वेक्षणाचे काम करणार आहेत.
दुसरीकडे शिक्षण विभागातील (education department) सर्वाधिक ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांना कामाला जुंपण्यात येणार असल्यामुळे महापालिका आणि त्याच्याशी संलग्न शाळांतील बहुतांश शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर असतील, यामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज जरांगे पाटील पुण्यात…
आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मोर्चाचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांचा आजचा मुक्काम पुण्यात असणार आहे. आज दुपारचं भोजन भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे केल्यानंतर आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. २६ जानेवारी रोजी जरांगे पाटील मोठ्या संख्येने मुंबईत धडकणार असल्याचा दावा केला जात आहे.