मुंबई : विधानसभा निवडणुकीत मोठ्या जनाधारामुळे राज्यात महायुती सरकार स्थापन झाले. मात्र, अद्याप महाविकास आघाडीला रिक्त असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची कोंडी फोडता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या पदावर दावा केला असून, या संदर्भातील अधिकृत पत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केले जाणार आहे. ठाकरे गटातील सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेते निवडीचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना सोपवले असल्याची खात्रीलायक माहिती ठाकरे गटातील एका ज्येष्ठ नेत्याने शुक्रवारी दिली.
एकीकडे विरोधी पक्षनेते पदाचा तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः पुढाकार घेत आहेत. ते लवकरच राज्यभर दौरे करणार असून, महाविकास आघाडीत असलेल्या मतभेदांवर तोडगा काढण्यावर त्यांचा भर राहणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी त्यांनी आघाडीतील सर्व नेत्यांशी चर्चा केली असून, अंतर्गत वाद दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या चुका टाळत, या पदासाठी सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्याची त्यांची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, ठाकरे गटातील आमदारांचा एक मोठा गट सुनील प्रभू यांच्या विरोधात असून, त्यांच्या आक्रमक आणि आक्रस्ताळ्या शैलीमुळे हे पद त्यांना देऊ नये, अशी या गटाची भूमिका आहे. दुसरीकडे, भास्कर जाधव यांचा थोडासा फटकळ स्वभाव असला तरी, ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. त्यामुळे, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना जाधव हे अधिक योग्य पर्याय वाटत आहेत.
याउलट, मातोश्रीच्या मर्जीत असलेले आणि उद्धव ठाकरे यांच्याशी कायम निष्ठावान राहिलेले सुनील प्रभू यांच्या बाजूने ठाकरे निर्णय देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जर त्यांनी हा निर्णय घेतला, तर ठाकरे गटात मोठी फूट पडण्याचा धोका निर्माण होईल. सध्या गटातील पाच ते सात आमदार आगामी पाच वर्षांचा विचार करता आणि मतदारसंघातील विकासकामांच्या दृष्टीने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे, पाच-सहा आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्षांतर बंदी बाबतचा निर्णय प्रलंबित आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा असेपर्यंत , हा निर्णय लवकर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे, जर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसंदर्भात चुकीचा निर्णय घेतला, तर अधिवेशनादरम्यानच ठाकरे गटात मोठी फूट पडण्याची शक्यता असल्याचा इशारा संबंधित नेत्याने दिला आहे.