X : @therajkaran
नागपूर
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून काहींनी अरेबियन नाइट्स अगदी पर्शियन नाइट्स म्हणता येतील, असे कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केले, अशी सनसनाटी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा चर्चेच्या उत्तरात दिली.
पोतडीत खूप काही आहे, ते वेळोवेळी बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रस्ते बनविणाऱ्या कंपनीला २७० कोटी रुपयांची ५७ कामे देण्यात आली. त्यांनी उपकंत्राट बोरीवलीच्या कोणा कपडे दुकानदार रोमिन शेडा (Romin Chheda) यांना दिले. ज्यांना अशा कामांचा कोणताही अनुभव नव्हता.
आधी जिजामाता उद्यान मधील ‘पेंग्विन’ व्यवस्थेचे काम, कोरोना काळात ‘ऑक्सिजन प्लॅन्ट’चे ६० कोटी रुपयांचे काम, या कामातील दोन टक्के रक्कम मूळ रस्ते बांधकाम करणार्याच्या खात्यात, तर उर्वरित ९८ टक्के रक्कम रोमिन छेडा याच्या खात्यात जमा झाली. जुलै २०२० पर्यंत पूर्ण करायचे होते, काम प्रत्यक्षात ऑक्टोबर २०२० मध्ये झाले. बनावट कागदपत्रे करून ते ऑगस्ट २०२० मध्ये झाल्याचे दाखवण्यात आले. त्यासाठी केवळ ३ कोटी रुपयांचा दंड आकारला आला. प्रत्यक्षात दंड ९ कोटी रुपये इतका घेणे अपेक्षित होते. यानंतर रोमिन छेडा यालाच प्रशासकीय कार्यालयांचे बांधकाम, पेग्विंग कक्ष दुरुस्ती, पेग्विंनला मासे पुरवणे आदी विविध ८० कोटी रुपयांची कामे देण्यात आली. हा पैसा कुणाच्या खिशात गेला याची चौकशी सुरू आहे.
शिंदे पुढे म्हणाले, कोरोना काळात लाईफ लाईन या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या कंपनीने काल्पनिक रुग्ण आणि डॉक्टर दाखवून त्यांच्या नावाने पैसे लाटले. औषधांचाही खर्च घेतला. ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) मध्ये गंजलेले पाईप वापरण्यात आले. त्यामुळे काही रुग्णांना ‘ब्लॅक फंगर’ चा त्रास झाला, तर काही रुग्णांचे डोळे गेले; काहींचा मृत्यू झाला. परंतु पैसे कमवणार्यांना कोणतेही सोयरसुतक वाटले नाही.
कोरोनाच्या काळात महानगरपालिका प्रशासनाकडून कामगार आणि गरीब नागरिकांना ३३ रुपयांमध्ये ३०० ग्रॅम खिचडी देण्याचे कंत्राट (Khichadi contract) दिले. हे कंत्राट मूळ कंत्राटदाराने अन्य ठेकेदाराला दिले. मात्र सोळा रुपयांत फक्त १०० ग्रॅम खिचडी दिली. किचन म्हणून गोरेगाव येथील ‘परशियन दरबार’ हे हॉटेल दाखवण्यात आले; मात्र मालकाने आपला काहीही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. हे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोरोना काळात महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात काम करणार्या राठोड नावाच्या व्यक्तीला भायखळा येथील महापौर बंगल्यामध्ये बोलावून त्यांच्या पोला हायड्रो लॅब या आस्थापनाला रेमेडाईस औषधांचा पुरवठा करण्याचे काम देण्यात आले. प्रती नग ६५० रुपयांप्रमाणे ४० हजार रेमेडाईस औषधांचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले; मात्र ३१ हजार औषधांचा पुरवठा झाल्यावर त्यांनाच दोन लाख ‘रेमेडाईस’ औषधाचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले; मात्र या वेळी प्रती नगासाठी १ हजार ५६८ रुपये देण्यात आले.
याच काळात नवी मुंबई, भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका यांनी ६५० रुपयांत हे औषध खरेदी केले. याच औषधासाठी १ हजार ५६८ रुपये दिले गेले. हा महानगरपालिकेच्या ६ कोटी रुपयांवर डल्ला आहे, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.